मनाचे द्वंद्व का ?


"हितोपदेश" 
या प्राचीन भारतीय ग्रंथात मानवी मनाची तुलना एखाद्या माकडासारखी केली आहे.माकड ज्याप्रमाणे झाडावर एका फांदीवरून दुसरया फांदीवर नुसत्या उड्या मारत राहतो.त्या उड्या विनाकारणच असतात.मी माकडाला कधीही एकाच फांदीवर बसलेले पाहिले नाही,तुम्ही पाहिले आहे का ? नक्कीच नसणार आहे.माणसाच्या मनात एका दिवसाला किमान ७०,००० विचार येतात.माणसाचे मन स्थिर राहतच नाही.विज्ञानाने पण हे सिद्ध केले आहे की,प्रत्येक ३ सेकंदानंतर माणूस भूतकाळात जातो.भूतकाळात तुम्ही जे अनुभवले आहे त्यावरच तुम्ही काय होऊ शकते? काय होईल? काय होणार? काय करायला हवे? अशाप्रकारे आखाडे तयार करत असता,अनुमान बांधत असता .वर्तमानात तुमचे मन केवळ ३ सेकंदापर्यन्तच राहते.खरेतर तुमचे मन नेहमी तुमच्या सोबत नसतेच,असते  फक्त भूतकाळातील गोष्टींवर अनुमान बांधणे. जे घडत असते त्यावर तुमचा मेंदू काहीच प्रतिक्रिया करत नसतो, पुढे काय होणार आहे ह्याचेच अनुमान लावत असतो.जर तुम्ही निरीक्षण केले तर नक्कीच तुम्हाला ह्याची जाणीव होईल की,तुमचं मन किती माकड-उड्या मारते ते !
जाऊ द्या हे हसण्यासारखे नाही, मी माकड उड्या म्हणल्यानंतर तुम्हाल नक्कीच हसू आले असेल.

मी पाहिले आहे की,अनेक खेळाडूना(खेळाडूच काय आपल्यातील प्रत्येकाला ) पण मनाच्या ह्या द्वंद्वाला  सामोरे जावे लागते.मनातलं हे द्वंद्व दररोज चालत असते, अगदी नित्यक्रमाच्या कामातही.मी सकाळी किती वाजता उठू ?लवकरच का उठू? लवकर उठले तर काय होईल? वगेरे वगेरे...माझ्या खेळात मी का पुढे जात नाही ? माझ्यापेक्षा माझा मित्र विनोद (काल्पनिक नाव )खूप छान खेळतो, माझा Performance कुठे  कमी पडतोय? हा खेळ सोडून दुसरा खेळ मी खेळायला हवा का ? असे  अनेक द्वंद्व तुमच्या मनात रोजच्या घडीला येतात.मनातल्या ह्या द्वंद्वाला कमी  करण्यासाठीचे  उपाय जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympic मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

१)मनाचा लांडगा पोसणे :

मला इथे एक गोष्ट आठवते,एक म्हातारा असतो तो त्याच्या छोट्याश्या ९ वर्षाच्या नातवाला एक गोष्ट सांगत असतो  की,प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन प्रकारचे लांडगे असतात,एक लांडगा लबाड,खोटारडा,द्वेषाने भरलेला,लोभी,अहंकारी,गर्विष्ठ ,दिखाऊ,मत्सर करणारा,असा असतो.तर दुसरा लांडगा हा शांतताप्रिय,प्रेमळ,दयाळू,सभ्य,विनम्र,ज्ञानी,विद्वान,कनवाळू,सकारात्मक,असा असतो,आणि दोघांमध्ये श्रेष्ठत्वासाठी चढाओढ लागलेली असते,मी मोठा की तू मोठा अशी स्पर्धा लागलेली असते.तो लहानसा मुलगा विचारतो मग कोणता लांडगा जिंकतो ?तो म्हातारा म्हणतो ज्याला तुम्ही पोसणार तोच लांडगा जिंकतो आणि मोठा होतो. त्या छोट्याशा मुलाला ह्या गोष्टीचा अर्थ कळला की नाही माहित नाही ,पण तुम्हाला ह्या गोष्टीचा अर्थ नक्कीच कळला आहे.

ह्या गोष्टीवरून मला असे कळले की,तुम्ही तुमच्या मनाच्या कोणत्या लांडग्याला पोसणार हे तुमच्याच हातात आहे.तुम्ही ज्या विचाराला  खतपाणी घालता तोच विचार,तोच गुण,तीच मनाची अवस्था पोसते आणि मोठी होते.तुम्ही जर तुमच्या मनात इतरांबद्दल मत्सर,द्वेष,घृणा वाढवत असाल तर तशीच प्रवृत्ती तुमची होते.तुम्ही जर  तुमच्यात इतरांबद्दल प्रेम वाढवत असाल तर तशीच प्रवृत्ती तुमची होते.


The Great Mohammd Ali अमेरिकन बॉक्सर केवळ त्याच्या खेळाच्या कौश्ल्यासाठीच प्रसिद्ध नाही तर खेळाच्या मैदानात त्याने प्रतिस्पर्ध्याशी कधीच द्वेषाने मत्सराने खेळला नाही तर खेळाच्या मैदानात तो केवळ आणि खेळाची स्पर्धा खेळली.तिथे ना  मत्सराची,ना द्वेषाची स्पर्धा होती.

 2)मनाचे तप :

भगवद्गीतेत एक श्लोक आहे,

मनःप्रसादःसौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः/

भावसंशुद्धीरीत्येत्त्पो मानसम्युच्य्ते //

ह्याचा अर्थ असा होतो की,तुमच्या मनाची प्रसन्नता,सौम्यता ही एखाद्या संन्याशासारखी हवी.मन प्रसन्न असणे म्हणजे केवळ सतत हसणे, खिदळणे किंवा नाचत राहणे नव्हे.मननिग्रह म्हणजे तुम्ही तुमच्या आत्मकेंद्री होणे,तुमच्या मनाची हाक ऐकणे,तुमच्या आतून येणारा आवाज ऐकणे.जो स्वतः चा आवाज ऐकतो तो नक्कीच  इतरांच्या मनातील आवाज ऐकतो.जो स्वतः च्या  मनाची भावना ही शुद्ध, पवित्र ठेवतो,तोच खरया अर्थाने मनाचे मानसिक तप करतो.


तुम्ही तुमचा स्वतः चा  आवाज कधी ऐकलाय का ? तुम्ही इतर काय म्हणतात,ते ऐकू शकता,समाज काय म्हणतो मित्र,नातेवाईक काय म्हणतात ते ऐकू शकता ,पण तुम्हाला स्वतः ला काय म्हणायचे तेच नेमके ऐकू येत नाही.मग तुम्ही तुमचे मन काय  म्हणते ते कसे ऐकणार ?

 Yes ,नक्कीच तुम्हाला तुमचे स्वतः चे मन काय म्हणते ते तर ऐकावेच लागेल.त्यासाठी तुम्हाला रोज सकाळ - संध्याकाळ १५-१५ मिनिटांचे ध्यान करावेच लागेल.तरच तुम्ही तुमच्या मनाचे ऐकू शकता.आणि मनाचा तप करू शकता. 

३)मनाच्या रथाचा सारथी व्हा :

तुम्ही रथ पाहिला आहे,रथाला पुढे दोन घोडे लावलेले असतात आणि रथ हाकणारा सारथी असतो. रथ पूर्णपणे घोड्याच्या मनावर चालतो का? तर नाही.घोड्यांनी जर त्यांचे आवडते खाद्य पाहिले अर्थात चण्याचे शेत,ज्वारीचा हुरडा,गव्हाच्या ओम्ब्या,वगेरे,वगेरे... तर घोडे तिथेच खात बसतील. मग रथ पुढे कसा  जाणार ? अर्थात जाणारच नाही.ह्याचाच अर्थ,रथ जर घोड्याच्या मनावर चालला तर रथ पुढे जाईल का ?नक्कीच नाही.म्हणूनच तर रथाला हाकणारा सारथी असतो.म्हणूनच तर माणसाच्या मनाची तुलना उपनिषदांमध्ये ५ घोड्यानी ओढल्या जाणारया रथासोबत केली आहे.ते ५ घोडे त्यांना वाटले तर नक्कीच तुम्हाला ५ वेगवेगळ्या दिशांना ओढत घेऊन जातील पण तसे होत नाही. कारण रथाचा  लगाम हा सारथीच्या हातात असतो.

तुम्हाला ठरवायचे आहे की,तुमचा रथ कुठे घेवून जायचे ते.तुम्हाला खूप इच्छा असते की,सकाळी लवकर उठून ५ किलोमीटर धावेन पण तुमचे मनच तुम्हाला आडवत असते.तुम्हाला तू धावलास तर काय होणार आहे,धावलास तर थकून जाशील,दम लागेल,बास्स...झाले आता एवढे धावले मी, वगेरे,वगेरे..


मग तुम्हाला ठरवायचे आहे की,तुम्हाला तुमच्या मनाचा  रथाच्या  घोड्याची गोष्ट ऐकायची की सारथी बनून रथ हाकायचा ते .तुम्ही तुमच्या मनाच्या रथाचे सारथी व्हा,घोडा झालात तर असे भरकटत जाल,किंवा मग तुम्हाला कोणीतरी भरकटवत घेऊन जाईल.

४) मनाचे स्वास्थ्य :

 तुम्ही सकाळी ground वर जर morning walk करत असाल तर चालताना एखादा जर तुमच्या पुढे जात असेल , तर तुम्हाला उगाचच वाटते की मला त्याच्याही  पुढे जायचे आहे .fast walk ने नक्कीच तुमच्या शरीरावर चांगलेच परिणाम होणार आहेत हे तुम्हाला माहित असतेच,परंतु मनाचे काय ?  तुमचे मन दुषित झाले,तुमच्या मनात द्वेष, मत्सर ह्या भावना आल्याच ना !

तुम्ही जर मनाचे स्वास्थ्य टिकवले तर नक्कीच तुमचे शारीरिक स्वास्थ्य सुधारते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.


ह्यासाठी मी इथे एक उदा.सांगेन 100 व्यक्तींवर हा केलेला प्रयोग.100 व्यक्तींना सांगण्यात आले की,हे नारळ पाणी आहे आणि हे खूप शुद्ध आहे हे पिल्याने  तुम्हाला fresh वाटेल तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारेल.आणि त्या 100 व्यक्तींना प्रत्येकी 2 ह्याप्रमाणे  नारळपाणी देण्यात आले.आणि १५ मिनटानंतर सगळ्यांचे अभिप्राय घेतले गेले. 100 व्यक्तींपेकी केवळ ५ लोकांना ती जाणीव झाली.९५ लोकांना ती जाणीवच झाली नाही. कारण त्यांनी नारळपाण्याचा आस्वाद त्या शुद्ध भावनेने घेतलाच नव्हता.म्हणून त्यांच्या वर परिणाम झाला नाही.सांगायचा मुद्दा एकच की,आपण प्रत्येक घटनेला जर शुद्ध पवित्र भावनेने स्वीकारले तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर झालेला तुम्हाला जाणवेल. 

मी अनेक खेळाच्या स्पर्धांमध्ये पाहिले आहे की,अनेक खेळाडू स्पर्धांमध्ये खेळताना प्रत्येक घटनेचा  शुद्ध,पवित्र मनाने स्वीकार करत नाहीत .नुसते वादविवाद करत राहतात.प्रत्येक घडीला निर्भाव मनाने  तुम्ही अनुभवले, तर नक्कीच तुमच्या मनाचे स्वास्थ्य टिकेल आणि शरीराचेही.

माझ्या ह्या गोष्टी नक्कीच तुमच्या मनाला प्रभावित करत असणार,ह्याची मला खात्री आहे.तर ह्या गोष्टींचा अवलंब करायला सुरुवात करा आणि तुमच्या खेळातील तुमची स्पर्धा अगोदर तुमच्या मनाशी जिंका, मग जग जिंकायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. मग कोणताही वेळ न  घालवता  स्वतः च्या मनावर स्वतः च राज्य करा, नाहीतर तुमचे मन गुलामीतच राहील.स्वतः च्या मनाचा राजा बना,स्वतः च्या मनावर स्वतः च ताबा मिळवा, नाहीतर जग तुमच्या मनावर कधी  राज्य करेल ते तुम्हाला कळणार पण नाही,आणि मग मनातले द्वंद्व आपोआप नाहीसे होणार .

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.

ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा.




टिप्पण्या

  1. एकच नंबर मायाताई ..खूप सुंदर झाला ब्लॉक...!

    उत्तर द्याहटवा
  2. जबरदस्त ब्लॉग माया ताई
    छान मार्गदर्शन केलंत

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय